धुळे जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत आपले स्वागत आहे.
धुळे जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत आपले स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची स्थापना सन १९७१ मध्ये करण्यात आली होती, आणि त्याच वळणावर, राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालये स्थापन केली गेली आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, तसेच राज्य शासनाच्या क्रीडा विकासाशी संबंधित विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. राज्य शासनाने क्रीडा विकासासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर अनेक योजनांची सुरूवात केली आहे. या योजनांचे यशस्वी कार्यान्वयन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे करण्यात येते. क्रीडा हा मानवाला मिळालेली एक अमूल्य निसर्गदत्त देणगी आहे. प्रत्येक व्यक्तीला क्रीडाशी कशा ना कशा पद्धतीने जोडले गेले आहे. काही लोक थेट क्रीडा क्षेत्रात सहभागी होतात, तर काही लोक सहाय्यक भूमिका बजावून या क्षेत्राशी जोडलेले असतात.
सद्याच्या युगात जग अत्यंत वेगाने जवळ येत असून, यासाठी खेळ क्रीडा हे अत्यंत प्रभावी माध्यम ठरत आहे. खेळामुळे जशी संघ भावना वाढते तशीच राष्ट्रीय एकात्मता सुध्दा वृध्दींगत होते. राज्यात क्रीडा संस्कृतीची पाळेमुळे खोलवर उतरली असून, त्या दृष्टीने धुळे जिल्हयात देखील क्रीडा संस्कृतीचे संवर्धन वृध्दींगत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्यच आहे. या करीता जिल्हा क्रीडा परिषद, धुळे मार्फत प्रती वर्षी शैक्षणिक सत्रात विविध स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. या क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे जिल्हयातील सर्व खेळाडूंनी उत्साहाने भाग घेऊन आपले कौशल्य दाखवावे व आपल्या क्रीडा नैपुण्याने सर्वोत्तम प्रदर्शन दाखवून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचून जिल्याचा व पर्यायाने राज्याचा नाव लौकीक वाढवावा हीच अपेक्षा आहे. सुदृढ शरीर व समाज निर्मितीसाठी योग विद्या हे वरदान आहे. त्याचा नियमित अंगीकार सर्वांनी करुन निरामय व सक्षम आयुष्य जगावे यासाठी दरवर्षी दि. 21 जून रोजी जागतीक योग दिन शासना मार्फत व्यापक प्रमाणावर आयोजित करण्यात येतो. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे मार्फत नवीन तयार करण्यात आलेल्या या संकेतस्थळावर जिल्यातील क्रीडा पुरस्कार्थी, युवा पुरस्कार्थी, राष्ट्रीय खेळाडू, क्रीडा संघटना, क्रीडा संकुल, विविध योजना व त्या योजनचे लाभार्थी, शासन निर्णय इ. विषयक अद्यावत माहिती खेळाडू व नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपण सर्वांनी त्याचे अवलोकन करुन जिल्हयात क्रीडामय वातावरणाची निर्मिती करुन आपली क्रीडा संस्कृती जोपासावी. धुळे जिल्हयातील सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक व सर्व क्रीडा प्रेमी नागरीकांना माझ्या शुभेच्छा !